घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक २५/०६/२०२४ रोजी सकाळी ०८ वाजेच्या दरम्यान फिर्यादीने मुलगा सायकलवर शाळेत पाठवून फिर्यादी कामानिमित्त त्याच्या दुकानात निघून गेले. दुकानात कामकाज करत असताना सकाळी ११.४५ वा. फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर फोन आला की, "तुम्हारा बच्चा हमारे कब्जेमें है, आप पाच करोड रुपये लेके आजावो, और बच्चा लेके जावो, नही तो हम उसे जानसे मार देंगे" असा फोन आल्याने फिर्यादी ताबडतोब मुलाच्या शाळेत गेला. त्या ठिकाणी चौकशी केली असता, मुलगा सकाळपासून शाळेत आला नसल्याचे वर्गशिक्षकाने त्यांना सांगितले.
फिर्यादी घाबरून जावून तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नोपाणी साहेब यांना कळविले. त्यांनी स.पो.नि. चव्हाण, पो.उप.नि. श्री. वाघ, अंमलदार सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, हजारे, कोकणे, भोसले व सदर बाजार पोलीस ठाण्याचे पो.उप.नि. नरोडे, अंमलदार रेंगे, जाधव, शेख असे दोन टिम बनवून तात्काळ फिर्यादीला सोबत घेवून सापळा रचून पैशाची बॅग घेण्यासाठी आले असता दोन आरोपींना पकडले व ओम्नी कारमधून विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या ताब्यातील मुलाला सुखरूप सुरक्षितरीत्या सोडवून पालकाच्या ताब्यात दिले.
तरी दिनांक २५/०६/२०२४ रोजी सकाळी ०८ ते रात्रीचे ०८.३० वाजेपावेतो अज्ञात ठिकाणी डांबून ठेवून चापटबुक्याने मारहाण करून रुमालाने तोंडाला व गळ्याला बांधून ठेवले होते. फिर्यादीस पाच कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती व खंडणी न दिल्यास एड्स आजाराचे स्टेरॉईड इंजेक्शन देवून खून करण्याची धमकी देण्यात आली होती. अशी फिर्याद फिर्यादीच्या सांगण्यावरून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
त्यानुसार तपास पूर्ण करून अंतिम अहवाल पोलीस उपनिरीक्षक बी. बी. नरोडे यांनी बाल न्याय मंडळ येथे दाखल केले.
मा. श्रीमती एस. एन. पुंड, प्रमुख दंडाधिकारी, बाल न्याय मंडळ तसेच सदस्या श्रीमती ए. एम. धन्नावत व सदस्य श्री. आर. बी. जगताप या मंडळाने सरकार पक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद लक्षात घेवून विधीसंघर्षग्रस्त बालकास कलम ३६३, ३६४-अ, ३२३, ५०६, सह कलम ३४ व १२०-ब भा.दं.वि. मध्ये दोषी ठरवून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे लहान मुलांच्या वॉर्डमध्ये प्रत्येक सोमवार व बुधवार सहा महिन्यासाठी सामुदायिक सेवा करायचे आदेश दिले आहे.
सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, पिडीत मुलगा, पंच, तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी साहेब, तपासिक अधिकारी बी. बी. नरोडे यांच्या साक्ष महत्त्वाची ठरल्या. तसेच सहा. सरकारी अभियोक्ता यांनी अंतिम युक्तीवाद केला.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा. सरकारी अभियोक्ता श्री. अतिक इ. परकोटे यांनी काम पाहिले व सदर प्रकरणामध्ये मा. पोलीस अधीक्षक जालना तेजबीर सिंह संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक श्री. संदीप भारती पो.स्टे. सदर बाजार, जालना तसेच कोर्ट पैरवी पोलीस अंमलदार पो.हे.कॉ. फेरोज खान यांनी मोलाची मदत केली.